Skip to main content

Translate

खरंच कसं घडवतोय आपण मुलांना!...

खरंच कसं घडवतोय आपण मुलांना!...

'हम दो हमारा एक' असं म्हणून एकच अपत्य जन्माला घालणारा हिंदू excessive family conscious  झालाय असं आपल्याला वाटत नाही का? आपल्या एकुलत्या एक मुलाचे सगळे लाड पुरवणे हेच हिंदू पालकांच्या आयुष्याचे ध्येय झालेले आहे. त्याचं बारसं, वाढदिवस, admission, नोकरी आणि लग्न, नंतर नातू या चौकटीतच विचार आपण करून ठेवलाय. आपल्या मुलाला लहानपणापासून सगळ्या सुखसुविधा पुरविण्या ची प्रतिज्ञा घेऊन हिंदू पालक आयुष्यभर धडपड करताना दिसत आहे. लहानपणी त्याला खायला काय घालायचे, साबण कोणती वापरायची, खेळणी कोणकोणत्या घ्यायच्या, कोणत्या शाळेत घालायचे, क्लासेस कुठे लावायचे, खेळ, स्विमिंग, स्केटिंग, ड्रॉईंग असं काहीतरी डेकोरेटिव्ह करण्यात दिवस दिवस, वर्षे कधी संपून जातात हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही.

 परंतु खरंच आपली मुले घडतातेय का? पक्की होतायेत का? की आपण त्यांना पिंजऱ्यातली वाघ बनवतोय, शो पीस.. आपल्या आजूबाजूची परिस्थिती अभ्यासा. नैसर्गिक, सामाजिक संकटं आ वासून आपल्या समाजासमोर उभी आहेत. वरचेवर घडणारे महापूर, दुष्काळ, दंगल, दगडफेक या नैसर्गिक आणि सामाजिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता आपल्या मुलांमध्ये असणार आहे का? आपण गेल्यानंतर अशा समस्यांना धीरोदात्तपणे तोंड देण्याची क्षमता आपण त्यांना देतोय का? की अशा समस्या आल्यावर क्षणार्धात कोलमडून पडण्याची व्यवस्था पालक म्हणून आपणच करून ठेवतोय? आपलं आयुष्य खडतर गेलं म्हणून माझ्या मुलाला कोणतीच अडचण येता कामा नये असा चंग बांधलेले पालक अहोरात्र काम करत असतात, झटत असतात. मुलांनी मागता क्षणीच नव्हे तर मागण्यापूर्वीच त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याची चढाओढ सगळीकडे चालू आहे. परंतु या धामधुमीत आपल्या मुलांना धडपड करण्याची, जिद्द, चिकाटीने एखादी गोष्ट मिळवण्याची, पराजय पचवण्याची सवय कधी लागणार? युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर आपली मुलं जगू शकतील? सामाजिक अस्थिरता, पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीत आपली मुलं किती टिकाऊ धरतील याचा विचार केलाय? विचार केला तर परिस्थितीचे गांभीर्य जागृत पालकांना लगेच लक्षात येईल.
 अगदी पंधरा-सोळा वर्षांच्या मुलांना सुद्धा वेळेवर जेवू घालण्याची धडपड करणारी आई पाहून कीव येते. छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्यासाठी तयार करताना अफजल खानाच्या जबड्यात जाण्याची परवानगी मासाहेबांनी कशी दिली असेल आणि काळजीपोटी ती दिली नसती तर शिवबा छत्रपती झाले असते? आणि हिंदवी स्वराज्य उभे राहिले असते? आपल्यापैकी किती पालकांच्या मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असेल? मुळात उपाशी राहण्याची भावना काय असते हे तरी त्यांना माहित आहे का? आपत्तीच्या प्रसंगी चिवटपणे जगताना उपाशी राहून पाण्या वाचून आणि इतर सर्व सुविधा नसताना स्वतःला जिवंत ठेवण्याची धडपड ते करू शकतील? समोरून एखादा धर्मांध जमाव चालून आला तर पळून जाण्याची तरी क्षमता आहे का? निधड्या छातीने तोंड देणं बाजूलाच?
केवळ उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळाली म्हणजे तो सुरक्षित राहिले असं आता म्हणता येणार नाही.
त्यामुळे विचार करा,  खरंच कसं घडवतोय आपण मुलांना!

Comments